Air India Express crash | एअर इंडिया विमान अपघात: २४९० कोटींचा विमा झटका | Biggest Aviation Insurance Payout In India

Air India Express crash | अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. मानवी जीवितहानीच्या दृष्टीने हा अपघात जितका मोठा आणि दुर्दैवी आहे, तितकाच त्याचा परिणाम आर्थिक क्षेत्रावरही झालेला आहे. यामध्ये सर्वात मोठा झटका विमा कंपन्यांना बसणार असून, याआधी कधीही न झालेली एवढ्या प्रचंड रकमेची विमा भरपाई त्यांना करावी लागणार आहे. या अपघातात आतापर्यंत २६५ जणांचा मृत्यू झाल्याचं अधिकृतपणे सांगण्यात आलं आहे. त्यात फक्त विमानातीलच नव्हे, तर इतर काही जमिनीवरील लोकांचा समावेशही आहे. मात्र विमानात एकूण २४२ प्रवासी होते, त्यातील २४१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना केवळ मानवी पातळीवरच नव्हे तर विमा क्षेत्रासाठीही एक ऐतिहासिक वळण ठरणार आहे.

या अपघातात नुकसान इतकं भयानक आहे की, विमा कंपन्यांना एकूण २४९० कोटी रुपयांपर्यंतची भरपाई द्यावी लागू शकते, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. विमा क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आकडा केवळ ‘हुल इंश्योरन्स’ म्हणजेच विमानाच्या हानीसाठी भरपाई करण्यासाठीचा आहे. याशिवाय ‘पॅसेंजर लायबिलिटी’ म्हणजेच प्रवाश्यांच्या मृत्यू किंवा दुखापतीसाठी देण्यात येणारी भरपाई यामध्ये समाविष्ट नाही. जर तीही गणना केली गेली, तर हा आकडा ४१५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. एवढ्या मोठ्या विमा दाव्याने भारतीय एव्हिएशन विमा इतिहासात एक नवीन आणि क्लेषदायक नोंद होणार आहे.

एअर इंडिया कंपनीने आपल्या ३०० हून अधिक विमानांसाठी जवळपास १.६६ लाख कोटी रुपयांचं विमा संरक्षण घेतलं आहे. ही विमा योजना मुख्यत्वे न्यू इंडिया एश्योरेंस आणि टाटा एआयजी या दोन कंपन्यांनी मिळून दिलेली आहे. मात्र अशा उच्चजोखमीच्या विमा योजनांमध्ये, सामान्यपणे ही जोखीम स्थानिक कंपन्यांकडे न ठेवता आंतरराष्ट्रीय री-इंश्योरंस कंपन्यांकडे सुपूर्द केली जाते. एअर इंडियाच्या बाबतीतही तसंच करण्यात आलं असून, लंडनस्थित एआयजी ही या री-इंश्योरन्स नेटवर्कचं नेतृत्व करत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू इंडिया एश्योरेंस या भारतीय कंपनीला या संपूर्ण दाव्याच्या केवळ पाच टक्के रकमेची जबाबदारी उचलावी लागणार आहे, तर उर्वरित ९५ टक्के जबाबदारी आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांवर पडणार आहे. यामुळे जरी देशांतर्गत विमा कंपन्यांना थेट मोठा आर्थिक फटका बसणार नसला तरी, जागतिक विमा बाजारात ही घटना एक मोठा धक्का ठरेल हे निश्चित आहे.

विमा भरपाईची प्रक्रिया दोन प्रकारांमध्ये विभागलेली असते. पहिला प्रकार – ‘हुल इंश्योरन्स’ – यात विमानाच्या संपूर्ण आर्थिक मूल्याच्या आधारे नुकसानभरपाई केली जाते. हा आकडा या अपघातात जवळपास २०० ते ३०० मिलियन डॉलर्स म्हणजेच १६६० ते २४९० कोटी रुपये इतका जाऊ शकतो. हा विमा विमानाचा पूर्ण नाश झाल्यास दिला जातो. याशिवाय दुसरा प्रकार म्हणजे ‘पॅसेंजर लायबिलिटी’, ज्यामध्ये प्रवाशांच्या मृत्यूनंतर किंवा जखमी झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना भरपाई दिली जाते.

ही भरपाई मॉन्ट्रियल कन्वेन्शन १९९९ अंतर्गत दिली जाते. या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार, प्रवाशांचा मृत्यू झाल्यास एअरलाईनने त्या प्रवाशाच्या वय, उत्पन्न, कुटुंबीयांची परिस्थिती यानुसार ठराविक नुकसानभरपाई द्यावी लागते. या आधारावरच २४१ प्रवाशांच्या मृत्यूसाठी किमान ५०० मिलियन डॉलर्स म्हणजेच ४१५० कोटी रुपये इतकी भरपाई लागू शकते.

एव्हिएशन इंडस्ट्रीमधील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, २०२० मध्ये कोझिकोड येथे झालेल्या एअर इंडिया अपघातात २१ प्रवाशांचा मृत्यू झाला होता आणि तेव्हा विमा कंपन्यांनी एकूण ३१५ कोटी रुपये भरपाई दिली होती. त्या तुलनेत, अहमदाबाद अपघाताची तीव्रता आणि मृत्यूसंख्या इतकी मोठी आहे की, या वेळेसची भरपाई याआधीच्या सर्व विक्रमांना मागे टाकणार आहे.

या घटनेचा एक मोठा परिणाम म्हणजे विमा कंपन्यांच्या धोरणांमध्ये आणि विमा हिशोब पद्धतींमध्ये होणारे बदल. भविष्यात विम्याच्या प्रीमियम दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. एव्हिएशन कंपन्यांना विमा संरक्षण घेणं अधिक महागडं पडणार असून, विमा कंपन्याही या जोखमींचा नव्याने आढावा घेतील. विशेषतः ‘री-इंश्योरन्स’ कंपन्यांच्या धोरणांमध्ये कडकपणा येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या घटनेने पुन्हा एकदा एअर सेफ्टी आणि मेंटेनन्स यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. विमान अपघाताचे कारण नेमकं काय होतं, यावर अद्याप चौकशी सुरू आहे. तांत्रिक बिघाड, मानवी चूक की हवामानाची अडचण – हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र या अपघाताचा परिणाम केवळ मृतांच्या कुटुंबीयांवरच नाही, तर विमान कंपन्यांपासून विमा कंपन्यांपर्यंत अनेक स्तरांवर जाणवणार आहे.

Leave a Comment